ग्रामविकास, जनजागृती आणि लोकसहभागाचा संदेश देत अभिनेते भाऊ कदम यांचा पालघर दौरा
पालघर, 14 जानेवारी (हिं.स.)। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जनजागृती व प्रबोधनाच्या उद्देशाने सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी पालघर जिल्ह्यातील हमरापूर, घोलवड व उमरोळी ग्रामपंचायतींना भेट दिली. या दौऱ्यादरम्यान ग्रामविकासाशी निगडित न
ग्रामविकास, जनजागृती आणि लोकसहभागाचा संदेश देत भाऊ कदम यांचा पालघर दौरा


पालघर, 14 जानेवारी (हिं.स.)।

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जनजागृती व प्रबोधनाच्या उद्देशाने सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी पालघर जिल्ह्यातील हमरापूर, घोलवड व उमरोळी ग्रामपंचायतींना भेट दिली. या दौऱ्यादरम्यान ग्रामविकासाशी निगडित नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करत त्यांनी ग्रामस्थ, शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच अंगणवाडी ताई, आशा व बचत गटातील महिलांशी संवाद साधला.

हमरापूर ग्रामपंचायत येथे पाच रुपयांत वीस लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देणाऱ्या वॉटर एटीएम या अभिनव उपक्रमाची माहिती घेत भाऊ कदम यांनी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे कौतुक केले. यावेळी खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन करून नियमित व्यायामशाळेलाही त्यांनी भेट दिली. वृक्षारोपण करून सीएसआर निधीतून बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.वनराई बंधाऱ्याची पाहणी करताना ग्रामस्थांनी या बंधाऱ्याला दिलेले ‘भाऊ बंधारा’ हे नाव विशेष भावले. या बंधाऱ्यावर भाऊ कदम यांनी स्वतः श्रमदान करत बंधाऱ्याच्या पाण्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. या बंधाऱ्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेला भेट देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग आणि लोकसहभागातूनच शाश्वत ग्रामविकास साध्य होऊ शकतो. अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे पालघर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

यानंतर वाडा खडकोना येथील बंधाऱ्याची पाहणी करून भाऊ कदम यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुढे घोलवड ग्रामपंचायतीत भेट देताना त्यांनी मध उत्पादन केंद्राची पाहणी केली. शासनाने महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे गाव म्हणून घोषित केलेल्या घोलवड येथील शुद्ध मध, बांबू उत्पादन, वारली कलेच्या वस्तू तसेच चिकूपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande