
चंद्रपूर, १४ जानेवारी (हिं.स.) । चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने उद्या गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० असेल. मतदारांना सुरक्षित, सुलभ व आदर्श मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष तयारी करण्यात आली आहे.
शहरात ५ पिंक बूथ आणि ५ आदर्श बूथही निश्चित करण्यात आले आहेत. चंद्रपूर महानगरपालिका मतदारसंघात २,९९,९९४ मतदारांसाठी ३५५ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. पिंक बूथमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला कर्मचारी, सुरक्षित वातावरण, विशेष सजावट आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आदर्श बूथ स्वच्छता, सुव्यवस्थित रचना, योग्य मार्गदर्शन आणि आदर्श व्यवस्थापनासाठी ओळखले जातील.
मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वाटप आज मंगळवार, १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून करण्यात आले. मतदान कर्मचाऱ्यांसाठी प्रवेश व बाहेर निघण्याची स्वतंत्र व्यवस्था, विविध पथकांची हजेरी नोंद, नाश्ता व चहाची सोय, साहित्य वाटपासाठी स्वतंत्र टेबल्स, संबंधित मतदान बूथाची माहिती, पोलिस प्रशासनाची व्यवस्था तसेच मतदान केंद्रांपर्यंत बस सुविधाही योजण्यात आल्या. या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे ३९१ पथकांचे एकूण १५६४ कर्मचारी त्यांच्या-त्यांच्या मतदान केंद्रांकडे वेळेवर रवाना झाले.
राज्य निवडणूक आयोगाचे नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. विजय भाकरे (भा.प्र.से.) यांनी प्रशासनाला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. मतदानपूर्व तयारी व साहित्य वाटपाच्या प्रक्रियेची त्यांनी प्रशंसा केली. महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना निर्भयपणे, शांततेत आणि उत्साहात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
पिंक बूथ ठिकाणे:-
पोलीस कल्याण सभागृह, पूर्व दिशा, खोली भाग – १
एम.बी. प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, माता मंदिर जवळ, कृष्णनगर,
खोली क्र. २
चांदा पब्लिक कॉन्व्हेंट,
दाताळा रोड, खोली क्र. ५
रफी अहमद किदवई हायस्कूल,
उत्तर बाजू, खोली क्र. १
पॅरामाऊंट कॉन्व्हेंट, नेताजी चौक, बाबुपेठ
आदर्श बूथ ठिकाणे:-
बी.जे.एम. कार्मेल अकॅडेमी, तुकूम
अमर शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा, खोली क्र. ४, इंदिरानगर
सेंट मायकल कॉन्व्हेंट, रामनगर
अभ्यंकर मनपा प्राथमिक शाळा, गडला मारोती मंदिराजवळ, खोली क्र. १
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, बाबुपेठ खोली क्र. ३
-----------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव