
पालघर, 14 जानेवारी (हिं.स.)।
केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाच्या वतीने ‘केळवे बीच पर्यटन ’ या भव्य महोत्सवाचे आयोजन २३, २४ व २५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. हा महोत्सव आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणात सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे.
महोत्सवात लाईव्ह ऑर्केस्ट्रा, सांस्कृतिक कलादर्शन, वस्तू बाजारपेठ, उद्योग प्रदर्शन तसेच फूड फेस्टिव्हलचे आकर्षण असणार आहे. तारांगण नृत्य, कोळी नृत्य, झुंबा यांसह विविध लोकनृत्ये व सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. याशिवाय मसाले, हस्तकला वस्तू, कटलरी, शेती उपयोगी उपकरणे, सोलार उत्पादने आदींचे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत.
खाद्यप्रेमींसाठी उकडीचे पदार्थ, पुरणपोळी, आळुवडी, फिश फ्राय, चिकन भुजिंग, फिश थाळी, चाट, भेळ, पाणीपुरी व विविध स्थानिक पदार्थांची मेजवानी उपलब्ध असेल.
या महोत्सवासाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सहआयोजक ग्रामपंचायत केळवे असून केळवे सागरी पोलीस ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. पर्यटन, स्थानिक उद्योग आणि सांस्कृतिक वारसा यांना चालना देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL