अमरावतीत अंमली पदार्थ विकणाऱ्याला अटक, सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.)।अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अमरावती श
अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; एम.डी. मॅफेडॉन विक्री करणाऱ्या आरोपीस अटक, सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त


अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.)।अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैधरित्या मॅथेडॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमावर धडक कारवाई करत मोठे यश मिळविले आहे. मा. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, गुन्हे शाखा अमरावती शहर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक कार्यरत होते. पथकाने गुप्त बातमीदार नेमून सातत्याने माहिती संकलन सुरू ठेवले होते. गुन्हे शाखेचे पथक आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. कोर्टाजवळील पोस्ट ऑफिस परिसरात एक इसम अवैधरित्या मॅथेडॉन (एम.डी.) नावाचा अंमली पदार्थ बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ नियोजन करून नमूद ठिकाणी सापळा रचला.व संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याचे नाव सलमान खॉ आमीर खाँ (वय २४ वर्षे), रा. इंदीरा नगर, हिवरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या अंगझडतीत ४८ ग्रॅम २१० मिलीग्रॅम मॅथेडॉन (एम.डी.) मॅफेडॉन पावडर मिळून आली. सदर अंमली पदार्थाची अंदाजे किंमत ४ लाख ४९ हजार २०० रुपये इतकी आहे. याशिवाय आरोपीकडून एक विवो कंपनीचा ऑरेंज रंगाचा मोबाईल फोन (किंमत अंदाजे १० हजार रुपये), इलेक्ट्रॉनिक वजन काटा व स्टीलचा चमचा (किंमत अंदाजे १ हजार १० रुपये) असा एकूण ४ लाख ६० हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाबाबत विचारणा केली असता आरोपीने सदर एम.डी. मॅफेडॉन हा अमरावती येथील ‘मुज्जु’ नावाच्या इसमाकडून घेतल्याची कबुली दिली. मात्र सदर इसम सध्या फरार असून त्याचा शोध गुन्हे शाखेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणी आरोपी सलमान खॉ आमीर खाँ याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फरार आरोपी मुज्जु यालाही आरोपी करण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande