आरोग्य विभागाची महिलांना मकरसंक्रांती भेट, नाशकात 'मेनोपॉज क्लिनिक'ला सुरुवात
नाशिक, 14 जानेवारी (हिं.स.)। महिलांच्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) काळात उ‌द्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक आरोग्य समस्यांवर वेळीच, शास्त्रीय व संवेदनशील उपचार मिळावे, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विशेष ''मेनोपॉज क्लिनिक'' सुरू करण्यात येणार
आरोग्य विभागाची महिलांना मकरसंक्रांती भेट, नाशकात 'मेनोपॉज क्लिनिक'ला सुरुवात


नाशिक, 14 जानेवारी (हिं.स.)।

महिलांच्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) काळात उ‌द्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक आरोग्य समस्यांवर वेळीच, शास्त्रीय व संवेदनशील उपचार मिळावे, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विशेष 'मेनोपॉज क्लिनिक' सुरू करण्यात येणार आहे. हे क्लिनिक मकर संक्रांत 14 जानेवारी पासून जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांसह, ग्रामीण रुग्णालयांत 'मेनोपॉज क्लिनिक' सुरू करण्यात येणार आहे, दर बुधवारी विशेष बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) स्वरूपात सेवा दिली जाणार आहे.

रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समधील बदलांमुळे महिलांमध्ये गरम झटके, झोपेचे विकार, चिडचिड, नैराश्य, सांधेदुखी, अस्थिसुषिरता, वजनवाढ तसेच हृदयविकाराचा धोका वाढणे अशा विविध समस्या दिसून येतात. अनेकदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. हे टाळण्यासाठी महिलांना सुलभ, समर्पित व सल्लामसलतयुक्त आरोग्यसेवा उपलब्ध देण्यासाठी 'मेनोपॉज क्लिनिक'ची संकल्पना राबवण्यात येत आहे. या क्लिनिकमध्ये महिलांची सविस्तर वैद्यकीय तपासणी, आवश्यक उपचार, मानसिक आरोग्य समुपदेशन तसेच आहार व जीवन शैलीविषयक करून मार्गदर्शन दिले जाणार आहे.

कॅल्शियम व व्हिटॅमिन-डी उपचार, आवश्यक तपासण्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहितीही येथे देण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. दर बुधवारी होणाऱ्या या विशेष ओपीडीचा महिलांनी लाभ घ्यावा, रजोनिवृत्ती काळातील लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून पुढील आयुष्य अधिक निरोगी व सुरक्षित बनवावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande