रत्नागिरी जिल्ह्यातील ५० हजार ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांचे 'जीवन मिशन'
रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुकर व्हावे आणि पोलीस व जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक वृद्धिंगत व्हावे, यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने १७ लोकाभिमुख उपक्रम हाती घेतले आहेत. यातील ''जीवन मिशन''
रत्नागिरी जिल्ह्यातील ५० हजार ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांचे 'जीवन मिशन'


रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुकर व्हावे आणि पोलीस व जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक वृद्धिंगत व्हावे, यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने १७ लोकाभिमुख उपक्रम हाती घेतले आहेत. यातील 'जीवन मिशन' अंतर्गत जिल्ह्यातील ५० हजारपेक्षा जास्त वयोवृद्धांचा डेटा संकलित करण्यात आला असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.

पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पोलीस दलाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. राज्यातच नव्हे तर देशातही पहिल्यांदाच अशा प्रकारचे विविध १७ उपक्रम एकाच वेळी राबवले जात आहेत. केवळ गुन्हेगारांवर कारवाई करणे एवढेच मर्यादित उद्दिष्ट न ठेवता, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधणे आणि विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर पोलीस दलाने भर दिला आहे. या उपक्रमांमुळे पोलीस दलाच्या कामकाजात सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन 'जीवन मिशन' राबवण्यात आले. यामध्ये ५० हजारांहून अधिक वृद्धांची माहिती संकलित करण्यात आली आहे. संकटकाळात किंवा मदतीची गरज भासल्यास पोलीस यंत्रणा तत्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. पोलीस पाटलांनाही प्रवाहात आणले.

सुरक्षेचा कणा असलेल्या 'पोलीस पाटील' या घटकाकडे अनेकदा दुर्लक्ष होते. मात्र रत्नागिरी पोलिसांनी या मिशनच्या माध्यमातून पोलीस पाटलांना पुन्हा जोमाने मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना या अभियानात सक्रिय सहभागी करून घेतले जात आहे.

या सर्व १७ अभियानांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचावी, यासाठी पोलीस प्रशासनाने एक अनोखा निर्णय घेतला आहे. यानुसार, दररोज एका नवीन उपक्रमाची माहिती माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली जाईल. यामुळे नागरिकांना पोलिसांच्या बदलत्या कार्यपद्धतीची जाणीव होईल आणि सहकार्याची भावना अधिक दृढ होईल. सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सूचना व सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

हे मिशन जिल्हा पोलीस दलाला नव्या दिशेकडे नेणारे उदाहरण ठरेल. आमचा प्रयत्न केवळ कारवाई करण्याचा नसून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा आहे, असे अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande