
नांदेड, 14 जानेवारी (हिं.स.)। हदगाव येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी उबाठाच्या सुनंदा भोळे यांची निवड झाली. स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे प्रभाकर वाकोडे आणि काँग्रेसकडून अजय सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
नगराध्यक्षा पदी रोहिणी भास्करराव वानखेडे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर उपनगराध्यक्ष कोण होईल याची उत्सुकता होती. उबाठाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने त्यांचाच उपनगराध्यक्ष होणार हे स्पष्ट होते, पण सातपैकी कोणाच्या गळ्यात पुष्पहार पडणार याकडे लक्ष होते. विद्या किशोर भोस्कर आणि गीता शिवा चंदेल यांच्या नावांची चर्चा असताना, अचानक सुनंदा भोळे यांचे नाव चर्चेत आले. खासदार नागेश आष्टीकर यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांना बोलावून तिघांच्या नावांची ईश्वरी चिठ्ठी टाकून सुनंदा भोळे यांचे नाव घोषित केले.
काँग्रेस आणि उद्धवसेनेची नगराध्यक्ष पदावरून युती झालेली नव्हती. परंतु, दोन्ही पक्षांचे मिळून १२ नगरसेवक निवडून आले होते, तर शिंदेसेना व भाजप मिळून ८ नगरसेवक निवडून आले होते. उद्धवसेनेचा उपनगराध्यक्ष होण्यासाठी काँग्रेसने मतदान करावे, त्या बदल्यात त्यांना एक स्वीकृत सदस्य देण्याचे ठरले.
सभागृहात मतदान हात वर करून करण्याचे ठरले. उद्धवसेनेच्या सुनंदा भोळे यांनी तसेच भाजपच्या अरुणा गुणवंत काळे यांनी अर्ज दाखल केला होता. मतदानानंतर सुनंदा भोळे यांना १२ मते मिळाली, तर अरुणा काळे यांना ८ मते मिळाली. गौरव मांडेकर यांनी सुनंदा भोळे यांना विजयी घोषित केले. ठरल्याप्रमाणे काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जवळगावकर यांचे स्वीय सहाय्यक अजय सूर्यवंशी यांची स्वीकृत सदस्य पदासाठी निवड झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis