नांदेड - निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज , ३ हजार पोलिस तैनात
महापालिका निवडणूक
नांदेड - निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज , ३ हजार पोलिस तैनात


नांदेड, 14 जानेवारी (हिं.स.)। तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, येत्या १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २० प्रभागांमधील ८१ जागांसाठी होणाऱ्या या रणसंग्रामासाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली असून, निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

मंगळवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत ४९१ उमेदवारांचे भवितव्य ५ लाख १ हजार ७९९ मतदार ठरवणार आहेत. मतदानासाठी शहरात एकूण ६०० केंद्रे उभारण्यात आली असून, त्यापैकी ७० केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरून मागवण्यात आलेला १४८१ पोलिसांचा फौजफाटा आणि एसआरपीएफच्या तुकड्यांसह एकूण ३ हजारहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

निवडणूक कामकाजासाठी ६६० मतदान पथके आणि ६० क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह ४ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा आरोग्य विभागानेही जय्यत तयारी केली असून, २५० कर्मचारी आणि प्रत्येक केंद्रावर आशा वर्कर तैनात राहतील. एकूणच, कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि चोख नियोजनासह नांदेड महापालिकेचा हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

महानगरपालिका हद्दीतील एकूण ६०० मतदान केंद्रांपैकी ७० केंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. या केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलिस बळ आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

जिल्ह्यासह बाहेरून मागवण्यात आलेले एकूण ३१४३ पोलिस कर्मचारी कर्तव्यावर तैनात असतील. या ताफ्यामध्ये १६६२ स्थानिक पोलिस आणि १४८१ बाहेरील जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण २१० पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व बंदोबस्त शहराच्या विविध भागांत कार्यान्वित असेल. पोलिस दलाच्या मदतीला आणि मतदान केंद्रांवरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यापैकी १३५० होमगार्डचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande