
रायगड, 15 जानेवारी (हिं.स.)। मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हाभर विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शुक्रवार (ता. १६) रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी सामूहिक स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वच्छता हा मानवी आरोग्याचा मूलभूत आधारस्तंभ असून स्वच्छ परिसरामुळे संसर्गजन्य आजारांना आळा बसतो. घरासोबतच परिसर स्वच्छ राहिल्यास नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहते, याच जाणिवेतून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्लास्टिक कचरा, सुका व ओला कचरा स्वतंत्रपणे गोळा करून त्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण व व्यवस्थापन करण्यात येणार आहे. सार्वजनिक रस्ते, गटारे, शाळा परिसर, दवाखाने व गावातील प्रमुख ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे.
या उपक्रमात तालुका स्तरावरील अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करून स्वच्छतेची सवय ही दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
आपली गावे, शाळा व परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके