चिपळूणसाठी लाल–निळी पूररेषा अन्यायकारक, बांधकाम व्यावसायिकांची ठाम भूमिका
रत्नागिरी, 15 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूण शहरावर आखलेली लाल व निळी पूररेषा मुळातच चुकीची व अन्यायकारक असून त्यामुळे बांधकाम व्यवसाय, व्यापारी, तसेच नगरपालिकेच्या महसुलावर गंभीर परिणाम झाला आहे, अशी ठाम भूमिका क्रेडाई (CREDAI) संस्थेच्या पदाधिकाऱ्य
चिपळूणच्या बांधकाम व्यावसायिकांची बैठक


रत्नागिरी, 15 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूण शहरावर आखलेली लाल व निळी पूररेषा मुळातच चुकीची व अन्यायकारक असून त्यामुळे बांधकाम व्यवसाय, व्यापारी, तसेच नगरपालिकेच्या महसुलावर गंभीर परिणाम झाला आहे, अशी ठाम भूमिका क्रेडाई (CREDAI) संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासमोर मांडली.

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याशी झालेल्या बैठकीत ही भूमिका त्यांनी मांडली. वीजनिर्मितीनंतर कोयना धरणातून सुमारे १७ हजार क्युसेक अवजल चिपळूणमधून वाहून जाते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा विचार न करता पूररेषा आखण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाशिष्ठी नदीतून २२ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असतानाही लाल व निळी पूररेषा कायम ठेवण्यात आल्याने हा निर्णय अन्यायकारक असल्याचे क्रेडाईने स्पष्ट केले.

राजेश वाजे यांनी सांगितले की, पुरामुळे केवळ चिपळूण शहरच नव्हे, तर लगतची गावेही बाधित झाली आहेत. डीपी तयार करताना मोठ्या चुका झाल्या होत्या, पाठपुराव्यानंतर तो रद्द करावा लागला. पाटबंधारे विभागाकडे मागील २५–३० वर्षांचा ठोस डेटा नसताना केवळ उरकण्याच्या भूमिकेतून पूररेषा आखण्यात आली. मोडक समितीच्या अहवालानुसार नद्यांचा प्रवाह बदलणे, गाळ साचणे व वीज निर्मितीनंतर सोडले जाणारे पाणी याचा थेट परिणाम चिपळूणच्या पूरस्थितीवर होत आहे.

अरुणशेठ भोजने यांनी गाळ काढण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना, डिझेल चोरी, अपुरी यंत्रसामग्री व केवळ दिखाऊपणा सुरू असल्याचा आरोप केला. भरती–ओहोटीमुळे नद्यांची वाहून नेण्याची क्षमता कमी झाली असताना त्याचा विचार न करता पूररेषा आखण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी क्रेडाई पदाधिकाऱ्यांनी पूररेषेमुळे इन्शुरन्स, कर्ज, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले. लाल–निळी पूररेषा हटवली किंवा शिथिल केली तर बांधकामे सुरू होतील आणि नगर पालिकेलाही महसूल मिळेल, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी हा विषय गांभीर्याने समजून घेतल्याचे सांगत, येत्या १५–२० दिवसांत उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे चिपळूण दौऱ्यावर येणार असून क्रिडाईच्या शिष्टमंडळाची त्यांच्याशी भेट घडवून आणू, अशी ग्वाही दिली. लाल व निळी पूररेषा हटवण्यासाठी किंवा त्यातील अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीस मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, नगरसेवक उदय जुवळे, कपिल शिर्के, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण यांच्यासह सुमारे ३५ बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande