
नवी दिल्ली, 15 जानेवारी (हिं.स.) - राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात पंतप्रधान भारताच्या गतिमान स्टार्टअप परिसंस्थेतील सदस्यांशी संवाद साधणार आहेत. निवडक स्टार्टअप प्रतिनिधी त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव मांडणार असून, पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
नवोन्मेषाचे संवर्धन, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि गुंतवणूक-आधारित विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने, तसेच भारताला नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी निर्माण करणाऱ्या राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या हेतूने, पंतप्रधानांनी 16 जानेवारी 2016 रोजी ‘स्टार्टअप इंडिया’ हा परिवर्तनकारी राष्ट्रीय उपक्रम सुरू केला.
मागील दशकात स्टार्टअप इंडिया उपक्रम भारताच्या आर्थिक आणि नवोन्मेषात्मक संरचनेचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे. या उपक्रमामुळे संस्थात्मक यंत्रणा अधिक सक्षम झाल्या असून भांडवल आणि मार्गदर्शन उपलब्धतेचा विस्तार झाला आहे. तसेच विविध क्षेत्रे आणि भौगोलिक प्रदेशांमध्ये स्टार्टअप्सची वाढ आणि विस्तार करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेमध्ये अभूतपूर्व विस्तार झाला असून देशभरात 2 लाखांपेक्षा अधिक स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. या उद्योगांनी रोजगारनिर्मिती, नवोन्मेष-आधारित आर्थिक विकास तसेच विविध क्षेत्रांतील देशांतर्गत मूल्यसाखळ्यांच्या बळकटीकरणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी