
रायगड, 16 जानेवारी, (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ६५६ मतदान केंद्रांवर ही निवडणूक घेण्यात आली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २० प्रभागांमधील ७८ जागांसाठी बहुसदस्यीय पॅनल पद्धतीने मतदान झाले असून यामध्ये ५५.६७ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. दिवसभर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
या निवडणुकीतील मतमोजणी सुरू झाली आहे. यासाठी शहरातील सहा ठिकाणी मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कळंबोली, खारघर, कामोठे, न्यू पनवेल आणि पनवेल परिसरातील विविध वॉर्ड कार्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयानुसार मतमोजणी होणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून निकालाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. या निवडणुकीच्या निकालातून पनवेल महानगरपालिकेच्या आगामी कारभाराची दिशा ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके