
छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)।
सिल्लोड नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीत झालेल्या आरोप प्रत्यारोप विसरून सर्वांनी आता शहराचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू समोर ठेवून कामकाज करावे. शहर विकासासाठी कटिबद्ध असून, एकदिलाने एकजुटीने काम करावे.शहराची व्याप्ती सातत्याने वाढत आहे त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,' अशी ग्वाही या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी शहर विकासासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला. शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यानंतर उपनगराध्यक्ष निवड व स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती बाबत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विठ्ठल म्हतारजी सपकाळ यांची निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे विठ्ठल सपकाळ आणि भाजपचे कमलेश कटारिया या दोघांचे अर्ज आले होते. भाजपचे कमलेश कटारिया यांच्या बाजूने केवळ तिघांनी मतदान केले. तर शिवसेनेचे विठ्ठल सपकाळ यांना २६ जणांनी हात उंच करून मतदान केले. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी विठ्ठल सपकाळ यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. या सभेत स्वीकृत सदस्य नियुक्तीबाबत प्रक्रियाही पार पडली. शिवसेनेचे गटनेता सुधाकर पाटील यांनी दिलेल्या नामनिर्देशनानुसार नंदकिशोर विठ्ठलराव सहारे सागर दामोदर जाधव आणि शेख बाबर शेख गुलाब बागवान यांची नियुक्ती करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis