
रत्नागिरी, 16 जानेवारी, (हिं. स.) : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात भूगोल विभागातर्फे भूगोल दिनानिमित्त विविध उपक्रम पार पडले.
भौगोलिक घटकांचे संवर्धन करणे, जीवावरणाचा ऱ्हास थांबविणे, वृक्षसंवर्धन व वृक्षनिर्मिती करणे यासारखी उद्दिष्टे समोर ठेवून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी सुमारे ३०,००० बीजांचे संकलन करून, त्यापासून बीजगोलक तयार केले. या बीजगोलकांचे निसर्गार्पण यानिमित्ताने करण्यात आले.
नैसर्गिक अधिवासात असणाऱ्या पक्ष्यांकरिता निवारा म्हणून बनविण्यात आलेल्या सुरक्षित घरट्यांचे यावेळी वितरण करण्यात आले. भूगोल दिनाच्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. स्वप्नाली झेपले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये प्रा. मयूरेश राणे यांनी भूगोल दिन साजरा करण्यामागची भूमिका व महत्त्व स्पष्ट केले व विद्यार्थ्यांनी राबविलेल्या विविध अभिनव उपक्रमांची माहिती दिली.
अकरावीच्या कला वर्गातील आकांक्षा शिवगण हिने बीजगोलक व घरटी बनविताना आलेल्या अनुभवांचे कथन केले. उपप्राचार्य डॉ.सरदार पाटील यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील उपक्रमशील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्राचार्य डॉ.नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते प्रतीकात्मक घरट्यामध्ये पक्षी ठेवून घरटी वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांनी अंगीकारलेल्या पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचा गौरव केला व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थिनी अक्षरा कांबळे हिने केले.
संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई व पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी