मुंबईच्या महापौर पदावरून संघर्ष; शिंदेसेनेचे नगरसेवक ताज लँड्स एंडमध्ये शिफ्ट
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)। मुंबईत महापौर पद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून देण्याची मागणी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांसह नेत्यांनी केली आहे. २३ जानेवारीपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत असून, या विशे
Shinde Shiv Sena


मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)। मुंबईत महापौर पद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून देण्याची मागणी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांसह नेत्यांनी केली आहे. २३ जानेवारीपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत असून, या विशेष वर्षात शिवसेनेचा महापौर असावा, अशी भूमिका काही नेत्यांनी मांडली आहे. शिवसेनेसाठी मुंबई हा भावनिक विषय आहे. गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेचा महापौर मुंबईवर आहे. मात्र आता शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच भाजपाचा महापौर मुंबईत विराजमान होणार असतानाच शिंदे गटाने आपल्या सर्व नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला असून, ते पुढील दोन ते तीन दिवस तिथेच मुक्कामी असतील. या मुळे मुंबई महापौर पदावरून सत्तासंघर्ष पहायला मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

या अगोदर भाजपासोबत वाटाघाटीत कायम एकनाथ शिंदे वरचढ होताना दिसले आहेत. मुंबईच्या जागावाटपातही सुरुवातीला शिवसेनेला ४०-५० जागा सोडण्याची तयारी भाजपाची होती. मात्र शिंदेंच्या भूमिकेमुळे अखेरीस महायुतीत ९० जागा शिंदेसेनेच्या वाट्याला आल्या होत्या. मात्र आता निकालानंतर सत्तेचे गणित जुळवताना शिवसेनेचं नेमकं काय स्थान असावे यासाठी भाजपा नेत्यांसोबत वाटाघाटी होणार आहेत.

पण कालच्या निकालानंतर मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे शिवसेनेने एकत्रितपणे सत्ता मिळवली असली तरी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपाचे ८९ आणि शिंदे गटाचे २९ नगरसेवक निवडून आले असून, सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या ११४ जागांच्या थोड्याच पुढे हा आकडा जातो. मात्र, संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतर्क झाले असून, आपल्या नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्याचा हा उपाय असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, ठाकरे बंधू आणि काँग्रेस एकत्र आल्यास महायुतीच्या सत्तास्थापनेला मोठा धक्का बसू शकतो. ठाकरे गटाला ६५, मनसेला ६ आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला १ जागा मिळून एकूण ७२ जागा आहेत, तर काँग्रेसच्या २४ जागा मिळून हा आकडा ९६ पर्यंत पोहोचतो. याशिवाय काँग्रेसविचारधारेच्या इतर नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यास बहुमताच्या जवळ जाणे शक्य आहे. त्यामुळे ठाकरे गटाने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास शिंदे गटातील नगरसेवक फोडणे सोपे ठरेल, अशी भीती शिंदे गटात व्यक्त होत आहे, कारण हे बहुतेक नगरसेवक पूर्वी ठाकरे गटाशी संबंधित होते.

दरम्यान, महायुतीत लढत असताना मागण्या होत असतात. परंतु महापौरपदाबाबत जो निर्णय घ्यायचा तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतील. आमच्याकडे सत्तेत कोण मुख्यमंत्री आणि कोण उपमुख्यमंत्री हे न पाहता विकासासाठी आम्ही काम करतो. मुंबईतील सत्ता स्थापनेसाठी एकत्रित बसून चर्चा होईल. परंतु योग्य तो समन्वय साधून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निर्णय होईल. मागणी करायला काही हरकत नाही वरिष्ठ पातळीवर निर्णय होत असतात. आमचे नेतृत्व समंजस आहे ते योग्य निर्णय घेतील. मागणी होऊ शकते परंतु एकनाथ शिंदे दबावतंत्र वापरतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

मुंबईवर युतीची सत्ता असली तरी आतापर्यंत महापौरपद शिवसेनेकडेच राहिले आहे. मात्र यंदा भाजपाच्या जागा अधिक असल्याने भाजपाच महापौर करणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तरीही अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद वाटून घेण्याचा तोडगा निघू शकतो का, यासाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे. यासोबतच स्थायी समित्यांसारखी महत्त्वाची पदेही आपल्या वाट्याला मिळावीत, यासाठीही जोर लावला जात आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे मुंबईच्या महापौर पदावर कोण विराजमान होणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande