पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा
हावडा ते गुवाहटी मार्गावर धावणार गाडी
देशातील पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान व इतर मान्यवर


मालदा, 17 जानेवारी (हिं.स.) । देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन मालदा येथून हावडा–गुवाहाटी (कामाख्या) मार्गावर धावणार आहे. ही वंदे भारत स्लीपर ट्रेन हावडा ते गुवाहाटी दरम्यान सेवा देईल. यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी मालदा येथे आयोजित प्रशासकीय कार्यक्रमात 3,250 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली.याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी 4 अमृत भारत एक्सप्रेस ट्रेननाही हिरवा झेंडा दाखवला. या गाड्या उत्तर बंगालमधील न्यू जलपाईगुडी आणि अलीपुरद्वारला देशातील इतर भागांशी जोडणार आहेत.

यापूर्वी देशात धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांमध्ये केवळ चेअर सीट्स होत्या, ज्यामुळे प्रवाशांना बसूनच प्रवास करावा लागत होता. मात्र आता स्लीपर सुविधेसह वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 180 किमी प्रतितास वेगाने धावण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. तथापि, प्रत्यक्षात तिचा कमाल वेग सुमारे 120 ते 130 किमी प्रतितास राहण्याची अपेक्षा आहे.पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. ही ट्रेन कोलकात्याजवळील हावडा आणि गुवाहाटीच्या कामाख्या जंक्शनला जोडणार आहे. ही ट्रेन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. पश्चिम बंगालमधील मालदा शहरातून पंतप्रधानांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. तसेच गुवाहाटी–हावडा वंदे भारत स्लीपर ट्रेनलाही त्यांनी येथूनच व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, “आधुनिक भारताच्या वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेली, पूर्णपणे वातानुकूलित वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांना परवडणाऱ्या भाड्यात विमान प्रवासासारखा अनुभव देईल. ही ट्रेन लांब पल्ल्याचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवेल. हावडा–गुवाहाटी (कामाख्या) मार्गावरील प्रवासाचा कालावधी सुमारे 2.5 तासांनी कमी होणार असून, त्यामुळे धार्मिक यात्रा आणि पर्यटनालाही मोठा चालना मिळेल.”ही ट्रेन 180 किमी प्रतितास कमाल वेगासाठी तयार करण्यात आली आहे, मात्र सध्या तिचा अपेक्षित वेग 120 ते 130 किमी प्रतितास इतका राहील. या ट्रेनमधील बर्थ्स एर्गोनॉमिक डिझाइनचे असून, जागतिक दर्जाच्या सस्पेन्शन सिस्टिमद्वारे त्यांना आधार देण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवाशांना अत्यंत आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रगत जंतुनाशक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जे 99 टक्के जंतू नष्ट करण्यास सक्षम आहे. सर्व प्रवाशांना स्वच्छ चादरी आणि टॉवेल्स उपलब्ध करून दिले जातील. ट्रेनमध्ये स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे असून ते संपूर्ण प्रवासादरम्यान बंद राहतील आणि केवळ स्टेशनवर पोहोचल्यानंतरच उघडतील.या ट्रेनमध्ये आधुनिक शौचालयांची सुविधा देण्यात आली आहे. हात धुण्यासाठी नळांमध्ये सेन्सर बसवण्यात आले असून स्वच्छतेसाठीही अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये आपत्कालीन ‘टॉक-बॅक’ युनिट बसवण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक सूचना ट्रेनमध्येच देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी ट्रेन मॅनेजर आणि लोको पायलटशी थेट संवाद साधू शकतील.भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेनचे भाडेही जाहीर केले आहे. ही ट्रेन गुवाहाटी आणि हावडा दरम्यान धावणार आहे. 3एसी वर्गात प्रवासासाठी भाडे 2,300 रुपये ठेवण्यात आले असून त्यामध्ये जेवणाचाही समावेश आहे. 2एसी वर्गासाठी भाडे 3,000 रुपये तर 1एसी वर्गासाठी भाडे 3,600 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande