भाजपच्या विकास मॉडेलवर जनतेचा, विशेषतः झेन-जी पिढीचा विश्वास – पंतप्रधान
मालदा, 17 जानेवारी (हिं.स.) : भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या विकासकामांवर देशातील जनतेचा, विशेषतः झेन-जी पिढीचा ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पश्चिम बंगालमधील मालदा येथून देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला श
नरेंद्र मोदी, पंतप्रधान


मालदा, 17 जानेवारी (हिं.स.) : भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या विकासकामांवर देशातील जनतेचा, विशेषतः झेन-जी पिढीचा ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पश्चिम बंगालमधील मालदा येथून देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला शनिवारी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपावर जनतेचा वाढता विश्वास दिसून येत आहे. ओडिशामध्ये प्रथमच भाजपाचे सरकार स्थापन झाले असून, त्रिपुरामध्ये अनेक वर्षांपासून भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळत आहे. आसाममध्येही मागील निवडणुकांत भाजपाला स्पष्ट जनादेश मिळाला असून, अलीकडेच बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा-एनडीए सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या चारही बाजूंना सुशासन देणारी भाजपाची सरकारे कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. आता बंगालमध्येही सुशासनाची वेळ आली असल्याचे मोदी म्हणाले.भाजपाविरोधात वर्षानुवर्षे खोटे आरोप आणि अफवा पसरवण्यात आल्या असल्या तरी आज मतदार भाजपाला आशीर्वाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचा उत्साह पाहता आगामी काळात पश्चिम बंगालमध्येही भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला ऐतिहासिक यश मिळाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. विशेषतः मुंबई महानगरपालिकेत भाजपाने प्रथमच विक्रमी विजय मिळवला आहे. तसेच केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथेही भाजपाचा महापौर निवडून आल्याचा उल्लेख त्यांनी केला. ज्या ठिकाणी भाजपाचा विजय कधी अशक्य मानला जात होता, तेथेही आज अभूतपूर्व पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पश्चिम बंगालच्या विकासासाठी आज अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आल्याचे सांगत मोदी म्हणाले की, नव्या रेल्वे सेवांमुळे प्रवास सुलभ होणार असून व्यापार आणि उद्योगांनाही चालना मिळेल. ट्रॅक मेंटेनन्सशी संबंधित सुविधांमुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन काली मातेच्या भूमीला कामाख्या देवीच्या भूमीशी जोडत असल्याचे सांगत त्यांनी बंगाल, आसाम आणि देशवासीयांचे अभिनंदन केले.

भविष्यात या आधुनिक ट्रेन सेवेचा विस्तार संपूर्ण देशभर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.भारतीय रेल्वे आधुनिकतेबरोबरच आत्मनिर्भर होत असल्याचे नमूद करत मोदी म्हणाले की, देशातच रेल्वे इंजिन, डबे आणि मेट्रो कोच तयार होत आहेत. भारत आज अमेरिका व युरोपपेक्षा अधिक लोकोमोटिव्ह तयार करत असून अनेक देशांना पॅसेंजर ट्रेन आणि मेट्रो कोचची निर्यात केली जात आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.-----------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande