
रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या इमारतीतील पालिकेच्या हनुमान व्यायामशाळेत आता विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
नूनत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यायामशाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी व्यायाम करणाऱ्या तरुणांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व्यायामासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री पालिकेकडून उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.याचबरोबर यापूर्वी दर महिन्याला आकारली जाणारी २०० रुपयांची फी आता पूर्णपणे रद्द करण्यात येत असून, यापुढे कोणाकडूनही एक रुपयाचीही फी आकारली जाणार नाही. सर्व तरुणांना व्यायामशाळेत विनामूल्य प्रवेश दिला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा नगराध्यक्षांनी केली. या निर्णयामुळे शहरातील तरुणांना आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरपालिकेच्या व्यायामशाळेचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले असून नव्या व आधुनिक यंत्रसामग्रीची भर घालण्यात आली आहे. नूतनीकरणानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर आता नगराध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून व्यायामशाळा पूर्णपणे सर्वसामान्यांसाठी खुली व विनामूल्य करण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी शिवसेनेचे पालिकेतील गटनेते अंकुश आवले, नगरसेवक कपिल शिर्के, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, ओंकार नलावडे, निशांत जंगम यांच्यासह व्यायामशाळेतील अनेक व्यायामपटू उपस्थित होते. पालिकेच्या निर्णयामुळे युवकांच्या आरोग्यवर्धनाला चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी