
लातूर, 17 जानेवारी (हिं.स.)। रेणापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली कंबर कसली आहे. भोकरंबा येथे पार पडलेल्या भव्य 'विजय संकल्प मेळाव्यात' भाजपचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी उमेदवारांची अधिकृत घोषणा करत विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.
भाजपचे रणधुरंधर: जाहीर झालेली उमेदवारी
आ. रमेशआप्पा कराड यांनी कामखेडा आणि पोहरेगाव गटातील विजयासाठी खालील नावांची घोषणा केली आहे:
सौ. सरिता शंकरराव भिसे – (उमेदवार: कामखेडा जिल्हा परिषद गट)
सौ. मनीषा दशरथ सरवदे – (उमेदवार: पोहरेगाव जिल्हा परिषद गट)
शरद दरेकर – (उमेदवार: कामखेडा प.स. गण)
संतोष चव्हाण – (उमेदवार: मोटेगाव प.स. गण)
प्रा. विष्णू गोरे – (उमेदवार: निवाडा प.स. गण)
मेळाव्यात बोलताना आ. कराड यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने केवळ गरिबांना गरीब ठेवण्याचे काम केले. मात्र मोदीजी आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात विकासाची गंगा घराघरात पोहोचली आहे. रेणापूर तालुक्यातील ४ जिल्हा परिषद आणि ८ पंचायत समितीच्या जागा जिंकून आम्ही विकासाचा नवा विक्रम प्रस्थापित करू.
या मेळाव्याचे अध्यक्षपद माजी आमदार अॅड. त्र्यंबकनाना भिसे यांनी भूषवले. भाजप हाच विकासाचा खरा मार्ग आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनीही तरुणांना साद घालत विकासासाठी आशीर्वाद मागितले.
याप्रसंगी विक्रमकाका शिंदे, भागवत सोट, नगराध्यक्षा शोभा आकनगिरे, शंकरराव भिसे, नवनाथ भोसले यांसह हजारो पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis