
ठाणे, 17 जानेवारी, (हिं.स.)। जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ, श्रीक्षेत्र नाणीजधाम पिठाचे पीठाधीश्वर प.पु. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आगमनानिमित्त १७ जानेवारी रोजी ठाणे येथील टिपटॉप हॉटेलमध्ये भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी कच्चे बंधारे संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्यास राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड तसेच अमृता देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील पिठाचे पीठप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना प.पु. रामानंदाचार्यजींनी विज्ञान, व्यवहार आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत विचार मांडले. यावेळी त्यांनी सांगितले की, “धर्मगुरू या नात्याने आम्ही हिंदू धर्माचे कार्य करीत आहोत. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या भूलथापांना बळी पडलेल्या हिंदू बांधवांना विधिवत हिंदू धर्मात पुनःप्रवेश देत आतापर्यंत १,५३,३४३ कुटुंबांचे घरवापसी करण्यात आली आहे.”
तसेच ‘जगद्गुरू के प्रेम हेतु – एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये १,११,४२४ वृक्षारोपण करण्यात आले असून, या संकल्पपूर्तीचा सोहळा मागील महिन्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडल्याची माहितीही त्यांनी दिली.
संस्थानातर्फे दरवर्षी १५ दिवसांचे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. मागील वर्षी या शिबिरामध्ये १,३६,२७० रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या.
धर्माचे संरक्षण करायचे असेल तर इंग्रजी शिक्षण आवश्यक असल्याचे स्पष्ट करताना प.पु. रामानंदाचार्यजी म्हणाले की, “याचा अर्थ मराठी भाषेला विरोध असा होत नाही.” म्हणूनच श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे समाजातील गोरगरीब मुलांना मोफत व दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाते.
या प्रसंगी अनेक मान्यवरांनी प.पु. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.
संस्थानाच्या वतीने अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर ४,५९८ कच्चे बंधारे उभारण्यात आले. या उल्लेखनीय कार्याची संकल्पपूर्ती प.पु. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते भव्य व दिव्य स्वरूपात संपन्न झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर