
परभणी, 18 जानेवारी (हिं.स.)।
मानव सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय आई महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील समाधान नगर येथील श्री राजीव गांधी विद्यालयात दिनांक २१, २२ व २३ जानेवारी रोजी हा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या महोत्सवात तीनही दिवस विविध सांस्कृतिक, वैचारिक व साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आई महोत्सवाच्या पहिल्याच वर्षात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींची उपस्थिती लाभणार असून हा महोत्सव परभणी जिल्ह्यासाठी एक पर्वणी ठरणार आहे. प्रत्येक वर्षी हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या महोत्सवात कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात येणार असून दररोज महाराष्ट्रातील नामवंत कवी, व्याख्याते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
शब्दसह्याद्री प्रतिष्ठान परभणी, शब्दसह्याद्री समाजकार्य महाविद्यालय परभणी यांच्या समन्वयाने तसेच गोपाळराव भुसारे व भुसारे परिवाराच्या वतीने या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
तीन दिवसांचे प्रमुख कार्यक्रम
जीवन सुंदर आहे…
आई महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २१ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे “जीवन सुंदर आहे” या विषयावर व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी माधवराव फड, ॲड. दीपक देशमुख, केशवराव दुधाटे, डॉ. शांताबाई दत्तात्रय वाघमारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
ज्योती साऊंची पुण्याई…
२२ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कवयित्री शांताबाई शिंदे यांच्या “ज्योती साऊंची पुण्याई” या काव्यगायनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीभूषण कांतराव काका देशमुख असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर जांगीलवाड, अनंत पांडे, मालनताई गणेशराव पाटील उपस्थित राहणार आहेत.
आई तुझा हात परिस…
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी २३ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांचा “आई तुझा हात परिस” हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रा. इंद्रजीत भालेराव तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ कराळे, श्रीहरी कांबळे, ॲड. जी. एन. डाखोरे, प्रा. डॉ. भीमराव खाडे उपस्थित राहणार आहेत.
आईच्या कर्तृत्वाचा गौरव, संस्कारांची जपणूक आणि साहित्य-संस्कृतीचा जागर करणारा हा आई महोत्सव मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis