भाषा हा विवादाचा नाही तर संवादाचा विषय - सचिन निंबाळकर
रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) | भाषा हा विवादाचा नाही तर संवादाचा विषय आहे आणि हीच शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर यांनी केले. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, संस्कृत
डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर. सोबत डावीकडून डॉ. दिनकर मराठे, प्रा. दिनेश रसाळ, प्रकाश देशपांडे.


रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) | भाषा हा विवादाचा नाही तर संवादाचा विषय आहे आणि हीच शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर यांनी केले.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, संस्कृत साहित्य अकादमी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

मंचावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत व प्राकृत विभागातील प्रा. दिनेश रसाळ, चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे प्रकाश देशपांडे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या.

निंबाळकर म्हणाले की, केवळ महाराष्ट्रात १० भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहे. शासन स्तरावरून संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य संस्कृत अकादमी कार्यान्वित करण्यात आली. येत्या काळात संस्कृत साहित्य अकादमीचे कार्य अधिक विस्तारित होणार आहे. अकादमीमार्फत संस्कृत भाषेतील लेखनाला प्रोत्साहन मिळावे आणि लेखकांना प्रेरणा मिळावी म्हणून पुरस्कार योजना राबवली जाणार आहे. त्याचप्रमाणे संस्कृत भाषेत विविध माहितीपूर्ण लेखनासाठी शासनाकडून अनुदानदेखील दिले जाईल. त्याचबरोबर संस्कृतची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी संस्कृत साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यालादेखील अनुदान देणार असल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande