

मुंबई, 18 जानेवारी (हिं.स.)। मराठी पत्रकारितेचे विद्यार्थी डॉ. संदीप मालु वरकुटे यांचा मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात सुवर्णपदकाने गौरव करण्यात आला. मुंबई गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थी डॉ. संदीप मालू वरकुटे यांना काल झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारंभात ‘श्रीमती विमलाबाई गरवारे सुवर्णपदक’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी, सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृह येथे पार पडला. या समारंभाचे अध्यक्षस्थान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राचार्य डॉ. अजयकुमार सुद उपस्थित होते. तर सन्माननीय अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील तसेच उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेचे संचालक डॉक्टर केयूर कुमार नायक हे देखील आपल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
या दीक्षान्त समारंभात मुंबई विद्यापीठ व त्याच्या अधिनस्थ महाविद्यालयांमधून शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीचा वार्षिक अहवालही सादर करण्यात आला.
याच समारंभात गरवारेच्या पाच विद्यार्थ्यांसह एकूण २१ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले असून, त्यामध्ये डॉ. संदीप मालू वरकुटे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ या गीताने करण्यात आली. डॉ. वरकुटे यांच्या या यशाबद्दल गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था, मराठी पत्रकारिता विभागाच्या वर्ग समन्वयक नम्रता कडू तसेच सर्व विषय शिक्षकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule