
लातूर, 18 जानेवारी (हिं.स.)।
हिंद-दी-चादर गुरु श्री तेग बहादूर साहिबजी यांचा इतिहास सर्व विद्यार्थी व समाजातील नागरिकांपर्यंत पोहचावा, यासाठी शिक्षण विभागामार्फत विशेष उपक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. सर्व आस्थापनांच्या शाळांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंद-दी-चादर गुरु श्री तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील मैदानावर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे भव्य कार्यक्रम राज्यस्तरीय समागम समिती व राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत होत आहे. या अनुषंगाने शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या जनजागृती कार्यक्रमाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीस शिक्षण सहाय्यक संचालक संजय पंचगल्ले, प्राथमिक शिक्षण विभागाचे नोडल अधिकारी संजय पारसेवार, माध्यमिक शिक्षण विभागाचे नोडल अधिकारी मधुकर ढमाले तसेच प्रशासन अधिकारी अशोक कदम व विभाग समन्वयक श्री माधव बाजगिरे हे उपस्थित होते.
राज्य समन्वयक समितीने शिफारस केलेले श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावरील गीत सर्व २ हजार ६६६ शाळा व महाविद्यालयांमध्ये दररोजच्या परिपाठात गाण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. हे गीत सर्व विद्यार्थ्यांना व समाजातील नागरिकांना श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाची ओळख करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे डॉ. मठपती म्हणाले.
याशिवाय, जनजागृती मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधून मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रॅलीद्वारे विद्यार्थी व शिक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 'हिंद की चादर' या उपाधीचे महत्त्व व त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतील, असे डॉ. मठपती यांनी सांगितले. या बैठकीला सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis