
नाशिक, 19 जानेवारी (हिं.स.)भारतीय जनता पक्षाने नाशिक महानगर पालिकेत ७२ जागा जिंकल्या असून पुर्ण बहुमत मिळाले आहे. भाजपला हे निर्भेळ यश मिळण्यामागे बुथ प्रमुख, पक्ष संघटना व लोकप्रतिनिधी आ.सीमा हिरे,आ.देवयानी फरांदे,आ.राहुल ढिकले यांच्या सामुदायिक प्रयत्नांनी मिळालेले सामुदायिक यश आहे.प्रचारात प्रामुख्याने केंद्र व राज्य सरकारची विकासकामे, सर्वसामान्यांकरिता राबवत असलेल्या योजना, नाशिक शहरातील तिन्ही भाजप आमदार यांच्याकडून सुरू असलेली विकास कामे या सर्वांचा परिणाम भाजपच्या यशात रूपांतरित झाल्याचे भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले. भाजपच्या यशात अनेक ज्ञात अज्ञात व्यक्ती, परिवार विचारांच्या लोकांची साथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड जाहीर सभा, त्या सभेत त्यांनी मांडलेली परखड मते, विरोधकांचे खोडून काढलेले दावे, कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आखलेली यशस्वी व्यूहरचना, पक्ष संघटनेने घरोघर जाऊन केलेला भाजपचा प्रचार अशा सर्व सकारात्मक बाबींमुळे भाजपने हे यश मिळवले आहे.
भाजप ही केडर बेस पार्टी आहे. इथे व्यक्तिकेंद्रित राजकारणाला थारा नाही. त्यामुळेच देशात नव्हे तर जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजप ठरला आहे. नाशिक महानगर पालिकेत भाजपला मिळालेले हे यश सर्व नाशिककर जनतेचे यश असुन त्यांनी भाजपच्या धेय्य धोरणांवर ठेवलेला विश्वास आहे. भाजप निश्चितच नाशिककर जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल व आगामी काळात कुंभ मेळ्याच्या निमित्ताने येणाऱ्या निधीचा पुरेपूर सदुपयोग होईल असा विश्वास सुनील केदार यांनी व्यक्त केला. भाजपने नेहमी अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पदे व लोकप्रतिनिधी करून मोठे केले आहे. यावरून पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष मोठा होत नाही हे भाजपने दाखवुन दिले आहे. भाजपने अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. त्यामुळे भाजपला मिळालेले यश हे भाजप पक्ष व कार्यकर्त्यांचे यश आहे असे केदार यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV