
- एकाच दिवशी 7,998 किलो कचरा संकलन- तब्बल 20 हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग
रायगड, 19 जानेवारी (हिं.स.)। मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात व्यापक स्वरूपात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या एकदिवसीय उपक्रमात ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्रांच्या परिसरात सामूहिक स्वच्छता करण्यात येऊन तब्बल 7,998 किलो प्लास्टिक व सुका कचरा संकलित करण्यात आला. मोहिमेत 20 हजारांहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
घर व परिसर स्वच्छ राहिल्यास आरोग्य चांगले राहते, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, शाळा परिसर, आरोग्य केंद्रे तसेच गावांतील मोकळ्या जागा स्वच्छ करण्यात आल्या. संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.या अभियानात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे तसेच स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी माणगाव तालुक्यातील काही गावांना भेट देत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांचा उत्साह दुणावला. श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. स्वच्छता ही केवळ एकदिवसीय उपक्रम न राहता जनआंदोलन व्हावे, हा या मोहिमेचा उद्देश असून रायगड जिल्हा स्वच्छतेत आदर्श ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके