अंबाजोगाईच्या उपनगराध्यक्षपदी दिनेश भराडिया बिनविरोध
बीड, 19 जानेवारी (हिं.स.)। अंबाजोगाई नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी लोकविकास महाआघाडीचे दिनेश भराडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्यासोबतच स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकिशोर मोदी, बबनराव लोमटे आणि संजय गंभीरे यांचीही बिनविरोध निवड जाहीर क
Dinesh Bharadia has been unanimously elected as the Deputy Mayor of Ambajogai.


बीड, 19 जानेवारी (हिं.स.)।

अंबाजोगाई नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी लोकविकास महाआघाडीचे दिनेश भराडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्यासोबतच स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकिशोर मोदी, बबनराव लोमटे आणि संजय गंभीरे यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

उपनगराध्यक्षपदी निवड झालेले दिनेश भराडिया हे प्रभाग क्र. ९ मधून नगरसेवक असून ते सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. प्रभागातील मतदारांशी असलेला दांडगा जनसंपर्क आणि लोकांच्या कामासाठी सदैव तत्पर राहण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांनी राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग पुनर्रचनेमुळे त्यांच्या हक्काचा भाग दुसऱ्या प्रभागात गेला असतानाही त्यांनी विजय मिळवला. त्यांच्या या अनुभवाचा आणि प्रशासकीय कामावरील पकडीचा विचार करूनच राजकिशोर मोदी यांनी त्यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी पुढे केले.

अंबाजोगाई नगर परिषदेत एकूण ३१ नगरसेवक असून, राजकिशोर मोदी यांच्या लोकविकास महाआघाडीकडे २० तर नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडे ११ नगरसेवक आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी शहरात मोठ्या राजकीय चढाओढीची आणि घोडेबाजाराची चर्चा रंगली होती. मात्र, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी राजकीय प्रगल्भतेचा परिचय देत लोकशाही मूल्यांचा सन्मान केला. आपल्याकडे संख्याबळ कमी असल्याचे मान्य करत त्यांनी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली आणि संभाव्य गैरप्रकारांना चाप बसला.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी संख्याबळाच्या आधारे लोकविकास महाआघाडीला दोन आणि शहर परिवर्तन जनविकास आघाडीला एक जागा मिळाली. त्यानुसार लोकविकास महाआघाडीकडून राजकिशोर मोदी आणि बबनराव लोमटे तर शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून संजय गंभीरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या तिन्ही जागांच्या निवडीवर बिनविरोध शिक्कामोर्तब झाले. या प्रक्रियेत शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे गटनेते म्हणून स्वतः नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी, तर लोकविकास महाआघाडीचे गटनेते म्हणून सय्यद ताहेर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande