
लातूर, 19 जानेवारी (हिं.स.)लातूर जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. ५ फेब्रुवारीला होणारे मतदान आणि ७ फेब्रुवारीची मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
मोबाइल आणि लाऊडस्पीकरवर बंदी!
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा राखण्यासाठी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात आता मोबाइल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर आणि वायरलेस सेट वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पीकर) वापरही करता येणार नाही.
केंद्राबाहेर मंडप किंवा दुकानांना परवानगी नाही
मतदान केंद्राच्या परिसरात गर्दी टाळण्यासाठी २०० मीटरच्या परिघात कोणतेही तात्पुरते मंडप, दुकाने किंवा इतर बांधकामे उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक कामाशी संबंधित नसलेल्या खाजगी वाहनांना आणि व्यक्तींना या परिसरात प्रवेश मिळणार नाही.
रस्त्यावरील रहदारीस अडथळा ठरणारे किंवा अपघातास निमंत्रण देणारे निवडणूक साहित्य सार्वजनिक ठिकाणी लावण्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ अन्वये बंदी घालण्यात आली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
महत्त्वाचे वेळापत्रक:
मतदान: ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी: ७ फेब्रुवारी २०२६
लागू नियम: भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३, कलम १६३.
प्रशासनाने घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे आता निवडणुकीच्या रिंगणात शिस्त पाहायला मिळणार आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis