
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : मंडणगड आणि दापोली परिसरातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेऊन येत्या २४ जानेवारीपासून मंडणगड ते नांदेड ही नवीन एसटी प्रवासी फेरी सुरू करण्यात येणार आहे.
दापोली-मंडणगड एसटी प्रवासी मित्र संघटना आणि कोकण एसटीप्रेमी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही बस सुरू करण्यात आली आहे. मंडणगड ते नांदेड ही बस दररोज सायंकाळी ४:३० वाजता मंडणगडहून सुटेल. ही गाडी दापोली आणि खेडमार्गे नांदेडला जाईल. परतीच्या प्रवासासाठी ही बस नांदेडहून सायंकाळी ४ वाजता सुटेल. या बस फेरीचे संगणकीय आरक्षण सुरू करण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही बस अत्यंत सोयीची ठरणार असून, जास्तीत जास्त प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी