
नांदेड, 19 जानेवारी (हिं.स.)।
शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या ऐतिहासिक 'शहीदी समागम' सोहळ्याचे विचार खेडोपाडी आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजेत, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले.
येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या प्रसिद्धी कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पापळकर यांनी प्रसिद्धी यंत्रणेला मार्गदर्शन केले. गुरुजींचे विचार जनसामान्यांपर्यंतपोहोचविण्यासाठी पारंपरिक पद्धतींसोबतच नाविन्यपूर्णउपक्रम राबविण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.
शिक्षण विभागासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी शिक्षण विभागाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पापळकर यांनी नमूद केले. शाळांच्या माध्यमातून प्रभात फेरी, निबंध, चित्रकला, प्रश्नमंजुषा आणि समूहगान असे उपक्रम राबवून विद्यार्थी व पालकांपर्यंत कार्यक्रमाचा संदेश पोहोचवावा. तसेच, शासकीय कार्यालये, पेट्रोल पंप आणि सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्ज लावून वातावरण निर्मिती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis