
सोलापूर, 19 जानेवारी (हिं.स.)।
महापालिका निवडणुकीत भाजपला ८७ जागांवर विजय मिळाला. आता १० सदस्यांमागे एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे. त्यानुसार भाजपला नऊ आणि आठ नगरसेवक निवडून आलेल्या एमआयएमला एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे. महापालिका आयुक्तांनी नगरसचिवांकडून मागितलेल्या मार्गदर्शनात तसे नमूद आहे.स्वबळावर महापालिका लढलेल्या भाजपला मुस्लिमबहूल प्रभाग १४ आणि २० मध्ये यश मिळाले नाही. त्याठिकाणी ‘एमआयएम’चे उमेदवार विजयी झाले. २६ पैकी २१ प्रभागात भाजप उमेदवारांना पॅनल टू पॅनल मते मिळाल्याने तेथील सगळेच उमेदवार विजयी झाले. आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वत:च्या जागेवर माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांचा पराभव झाला. त्यांना किंवा श्रीकांत घाडगे यांना ‘स्वीकृत’ची संधी मिळू शकते. तसेच भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी निवडणुकीत मोठी मेहनत घेतली. ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडी, जगदीश पाटील यांचेही योगदान आहे. याशिवाय अन्य काही उमेदवार, नवीन चेहऱ्यांनीही पक्षाला मोठी मदत केली. त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबात ‘स्वीकृत’ची लॉटरी लागू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड