
स्वबळावर निवडणुका लढवण्याचा कार्यकर्त्यांचा ठाम निर्धार
रायगड, ०२ जानेवारी (हिं.स.)। येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुका भारतीय जनता पक्षाची आराठी जिल्हा परिषद गट व गण तसेच बागमांडले पंचायत समिती गण निर्धार सभा शुक्रवार, दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी बापवन येथे तालुका उपाध्यक्ष श्री. दिलीप सालदूरकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या सभेचे अध्यक्षस्थान जिल्हा सरचिटणीस तथा श्रीवर्धन विधानसभा प्रमुख श्री. प्रशांत शिंदे यांनी भूषविले.
या निर्धार सभेस तालुक्यातील प्रत्येक गावातील बूथ प्रमुख व गाव अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असा ठाम सूर व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादामुळे सभेचे वातावरण उत्स्फूर्त व निर्धारपूर्ण झाले होते.
सभेत बोलताना तालुका अध्यक्ष आशुतोष पाटील म्हणाले, “आता आपण कोणाच्या पालख्या वाहणारे नाही. पक्षाच्या बळावर, संघटनेच्या ताकदीवर आणि कार्यकर्त्यांच्या जिद्दीवर निवडणुकीला सामोरे जाऊ. लढूया आणि जिंकूया,” असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत त्या वरिष्ठ पातळीवर मांडण्याचे आश्वासन दिले. “कार्यकर्त्यांचा स्वबळावर लढण्याचा निर्धार लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी व्यासपीठावर तालुका चिटणीस उमेश अडखळे, कोशाध्यक्ष गजानन निंबारे, उपाध्यक्ष उदय पाटील, ॲड. जयदीप तांबुटकर, आराठी जिल्हा परिषद गट अध्यक्ष सुदेश पालेकर, गण अध्यक्ष मंगेश खैरे, बागमांडले गण अध्यक्ष तुषार विचारे, संदीप रिकामे, अकलाख माहिंमकर, महेंद्र गोरीवले, वासुदेव सानप, गणपत रसाळ, लक्ष्मण आदावडे यांच्यासह बूथ अध्यक्ष व गाव अध्यक्ष उपस्थित होते.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके