
रायगड, 02 जानेवारी (हिं.स.)। म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या यशस्वी चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त श्री रविप्रभा मित्र संस्था, रायगड, म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल तसेच स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार दि. ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल, घन्सार कॉम्प्लेक्स, पहिला माळा, दिघी नाका, बस स्थानकाजवळ, म्हसळा येथे पार पडणार आहे.
या मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये नागरिकांच्या डोळ्यांची सखोल तपासणी करण्यात येणार असून मोतीबिंदू, काचबिंदू तसेच नेत्रपटलाशी संबंधित विविध आजारांचे निदान करण्यात येणार आहे. तसेच दृष्टीदोष असलेल्या रुग्णांसाठी चष्म्याचे नंबर तपासून माफक दरात चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेल, त्यांच्यासाठी अल्प दरात नेत्र शस्त्रक्रिया करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या शिबिरासाठी नामांकित व अनुभवी नेत्रतज्ज्ञांची उपस्थिती लाभणार असून रुग्णांना तज्ज्ञ मार्गदर्शन व योग्य उपचारांचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा सहज उपलब्ध व्हावी, तसेच डोळ्यांच्या आजारांचे वेळेत निदान होऊन दृष्टी सुरक्षित राहावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके