
रत्नागिरी, 21 जानेवारी, (हिं. स.) : स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमालेत येत्या शनिवारी रत्नागिरीत डॉ. शुभांगी मोहन गोखले यांचे संत तुकाराम महाराजांची अभंग मंत्रगीता या विषयावर व्याख्यान होणार आहे.
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) यांच्या वतीने आयोजित स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमालेअंतर्गत हे व्याख्याने शनिवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाच वाजता रत्नागिरीत वरच्या आळीतील अध्यात्म मंदिरात होणार आहे.
संत तुकाराम महाराजांच्या अभंग साहित्यावर सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. सौ. शुभदा गोखले मराठी, इतिहास विषयांच्या अभ्यासक असून त्यांचे बालभारतीच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत योगदान आहे. त्यांनी माध्यमिक शिक्षिका, अधिव्याख्याता तसेच मुख्याध्यापक म्हणून दीर्घकाळ कार्य केले आहे.
डॉ. गोखले यांनी “तुकाराम महाराजांची अभंग मंत्रगीता – एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली असून, अभंग मंत्रगीतेवर आधारित संशोधन, व्याख्याने, अभंग गायन व निरूपणाचे अनेक उपक्रम त्यांनी राज्यभर सादर केले आहेत. यामध्ये “स्वरूपाचा कल्पतरू”, “संत तुकाराम महाराजांची अभंग मंत्रगीता (सार्थ)” तसेच “तुका झाला स्वरूपवंत” या ग्रंथांचा समावेश आहे. समाज प्रबोधन, संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास यादृष्टीने त्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी विविध कार्यशाळा, स्पर्धा व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत असून सध्या यूट्यूब माध्यमातूनही त्यांची अभंग मंत्रगीतेवरील व्याख्यानमाला सुरू आहे.
रत्नागिरीतील त्यांच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी