अंबाजोगाईकरांना दिलासा : आता सहा दिवसाला पाणीपुरवठा!
बीड, 21 जानेवारी (हिं.स.)। अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठ्याबाबत दिलेले आश्वासन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी अवघ्या काही दिवसांतच पूर्ण केले आहे. शहरात यापूर्वी १२ ते १३ दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठा आता सहा दिवसांवर आला असून, यामुळे नागरि
अंबाजोगाईकरांना दिलासा : आता सहा दिवसाला पाणीपुरवठा!


बीड, 21 जानेवारी (हिं.स.)।

अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठ्याबाबत दिलेले आश्वासन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी अवघ्या काही दिवसांतच पूर्ण केले आहे. शहरात यापूर्वी १२ ते १३ दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठा आता सहा दिवसांवर आला असून, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक काळात शहराचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आणि पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी करण्याचे वचन मुंदडा यांनी दिले होते, त्याची प्रभावी अंमलबजावणी आता प्रत्यक्ष सुरू झाली आहे.

​पदभार स्वीकारल्यानंतर नंदकिशोर मुंदडा यांनी सर्वात आधी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा आणि वितरण प्रणालीमधील तांत्रिक अडचणी, गळती आणि वितरणातील नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. यातील त्रुटी दूर करून योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. प्रशासनाने केलेल्या या नवीन नियोजनानुसार आता शहरात सहा दिवसांआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

​पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहिती देताना मुंदडा यांनी स्पष्ट केले की, सध्या सहा दिवसांआड पाणी दिले जात असून भविष्यात हा कालावधी आणखी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तांत्रिक अडचणीमुळे केवळ चोबारा भागात सध्या सात दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, मात्र तिथली अडचणही लवकरच मार्गी लावली जाईल. वीजपुरवठ्यात काही मोठे तांत्रिक अडथळे आले तरच पाणीपुरवठ्याला एखाद्या दिवसाचा विलंब होऊ शकतो, अन्यथा नियमित पुरवठा सुरू राहील असे त्यांनी नमूद केले.

​पाणीपुरवठ्यासोबतच शहराची स्वच्छता आणि दिवाबत्तीच्या प्रश्नांनाही मुंदडा यांनी प्राधान्य दिले आहे. स्वच्छता विभागात सुसूत्रता आणण्यासाठी आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले असून, लवकरच हे कामही सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande