
रायगड, 21 जानेवारी (हिं.स.)। भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणेच कोकणात माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. विशेषतः गणपती मंदिरांमध्ये या उत्सवाचे खास आकर्षण पाहायला मिळते. रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रातील ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यात असलेल्या पुरातन श्रीसिद्धिविनायक मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थीनिमित्त गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
२२ जानेवारी रोजी साजऱ्या होत असलेल्या या माघी गणेशोत्सवानिमित्त कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव समिती तसेच अलिबागमधील गणेशभक्तांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती.
कुलाबा किल्ल्यातील हे आंग्रेकालीन ‘गणेश पंचायतन’ मंदिर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी उजव्या सोंडेचा श्रीसिद्धिविनायक, समोर डावीकडे सांब, उजवीकडे विष्णू तसेच मागील बाजूस सूर्य व देवी अशा पाच मूर्तींचा समूह असून यालाच गणेश पंचायतन असे संबोधले जाते. काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर थोरले राघोजी आंग्रे यांनी उभारले असून मंदिराचे सभागृह अष्टकोनी आहे.
माघी गणेशोत्सवानिमित्त राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. दिवसभरात सुमारे ५० हजारांहून अधिक भाविक श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेत असल्याची माहिती आहे. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी विशेष रांग व्यवस्था, तात्पुरत्या पुलाची उभारणी तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
उत्सवानिमित्त सकाळी काकडआरती, अभ्यंग स्नान, अभिषेक, दहा ते बारा या वेळेत कीर्तन आणि दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नवसाला पावणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे गणेश पंचायतन म्हणून या मंदिराला भाविकांमध्ये विशेष श्रद्धास्थान प्राप्त झाले आहे, अशी माहिती कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे सदस्य किशोर अनुभवणे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके