
रायगड, 21 जानेवारी (हिं.स.)।
म्हसळा तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून शिवसेना (शिंदे गट)चे तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले आणि शहर प्रमुख पवन भोई यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेत शिवसेनेत पुनःप्रवेश केला.
जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा म्हसळा तालुका शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला.काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या म्हसळा नगरपंचायतीतील नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश करून राजकीय भूकंप घडवला होता. मात्र त्या घडामोडीत प्रसाद बोर्ले व पवन भोई यांना विश्वासात न घेतल्याने ते नाराज झाले होते.
या नाराजीतून त्यांनी खासदार सुनील तटकरे यांचे नेतृत्व स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे म्हसळा तालुक्यात शिवसेनेला मोठा हादरा बसला होता.
मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादीत अपेक्षित सन्मान व कार्यक्षेत्र न मिळाल्याने बोर्ले व भोई यांनी पुन्हा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे म्हसळा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा मजबूत झाल्याचे चित्र आहे.
या पक्षप्रवेशावेळी माजी सभापती रवींद्र लाड, श्रीवर्धन मतदारसंघ संपर्क प्रमुख सचिन पाटेकर, तालुका प्रमुख बाबू बनकर, अमोल पेंढारी, नगराध्यक्ष फरहीन बशारथ, नगरसेविका राखी करंबे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मागील काही दिवसांत शिवसेनेत जोरदार ‘इंकमिंग’ सुरू असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके