
परभणी, 21 जानेवारी (हिं.स.)।
भारतीय डाक विभागातर्फे तरुणांसाठी युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 9 ते 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन संजय लिये, डाक अधीक्षक, परभणी विभाग यांनी केले आहे.
सदर स्पर्धेसाठी पत्रलेखनाचा विषय “सध्याच्या डिजिटल जगात मानवी संबंध का महत्त्वाचे आहेत, याबाबत मित्राला लिहिलेले पत्र” असा आहे. सदर पत्र इंग्रजी किंवा संविधानाच्या 8 व्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या कोणत्याही भाषेत लिहिता येणार आहे.
ही स्पर्धा इच्छुक शाळांमध्ये शनिवार, दि. 7 मार्च 2026 रोजी घेण्यात येणार असून, रविवार, दि. 8 मार्च 2026 रोजी अधीक्षक डाकघर कार्यालय, शनिवार बाजार परभणी, येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी इच्छुक स्पर्धक किंवा शाळांनी दि. 20 फेब्रुवारी, 2026 पर्यंत डाक अधीक्षक कार्यालय, परभणी येथे संपर्क साधून दोन प्रतींमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत तीन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) किंवा तत्सम कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र पोस्टल सर्कल (राज्यस्तर) पातळीवर निवड झालेल्या उत्कृष्ट पत्रांसाठी प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 10 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 5 हजार रुपये, आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या पत्रांसाठी अनुक्रमे 50 हजार रुपये, 25 हजार रुपये, 10 हजार रुपये इतकी रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट पत्र भारताच्या अधिकृत नामांकनाच्या रुपाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात येणार आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियनकडून निवड झालेल्या पत्रांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांसह प्रमाणपत्रे देण्यात येतील. तसेच सुवर्णपदक विजेत्याला युनिव्हर्सल पोस्टल युनियनचे मुख्यालय असलेल्या बर्न, स्वित्झर्लंड येथील भेट प्रायोजित करण्यात येईल किंवा युनिव्हर्सल पोस्टल युनियनने ठरवल्याप्रमाणे इतर इतर बक्षीस प्रदान करण्यात येईल.
तरी परभणी डाक विभागातील जास्तीत जास्त विद्यार्थी व शाळांनी युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधीक्षक संजय लिये यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis