अकोल्यात काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराकडून स्वपक्षावरच आरोप!
अकोला, 21 जानेवारी (हिं.स.)। स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीत मदत न केल्याने पराभव ओढवल्याचा थेट आरोप काँग्रेसच्या आमदारावरच करण्यात आला असून, यामुळे काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न
Photo


अकोला, 21 जानेवारी (हिं.स.)।

स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीत मदत न केल्याने पराभव ओढवल्याचा थेट आरोप काँग्रेसच्या आमदारावरच करण्यात आला असून, यामुळे काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एका बाजूला धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा आणि दुसऱ्या बाजूला उमेदवारांना वाऱ्यावर सोडण्याचं राजकारण, असा आरोप पराभूत उमेदवारांनी केला आहे.

अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकूण 21 जागांवर विजय मिळवला. मात्र प्रभाग क्रमांक 2 मधून माजी नगरसेविका चांदनी शिंदे यांचा 757 मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर चांदनी शिंदे आणि त्यांचे पती रवी शिंदे यांनी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्यावर गंभीर आरोपांचा पाऊस पाडला आहे.

निवडणुकीदरम्यान मुस्लिम बहुल भागात मतमागणीसाठी वारंवार विनंती करूनही आमदारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप चांदनी शिंदे यांनी केला आहे. मुस्लिम समाजाची मते मिळाली नाहीत, याला थेट आमदार जबाबदार असल्याचंही त्या ठामपणे सांगत आहेत. सेक्युलरतेचा दावा करणाऱ्या काँग्रेसमध्येच निवडक मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं जात असल्याचा आरोप यानिमित्ताने समोर आला आहे.

दरम्यान, चांदनी शिंदे यांचे पती रवी शिंदे यांनी काँग्रेसवर अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसमध्ये हिंदूंना डावललं जात असून, पक्षाला आता हिंदू मतांची गरज उरलेली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये ‘हिंदू बायकॉट’चा नारा अप्रत्यक्षपणे सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.निवडणुकीत पक्षाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं आहे. या घटनेमुळे अकोल्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चांगलाच उफाळून आला आहे.

एकीकडे सेक्युलरतेचा गवगवा आणि दुसरीकडे उमेदवारांमध्ये भेदभावाचे आरोप,अकोल्यात काँग्रेसची ही अंतर्गत लढाई पक्षासाठी डोकेदुखी ठरणार का, असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande