
अकोला, 10 मार्च (हिं.स.)।
पवित्र रमजान ईद जवळ येत असताना शहरातील ईदगाह परिसरांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देत शहरातील सर्व ईदगाह परिसरात तातडीने स्वच्छता, रंगरंगोटी व मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्वाचा सण असलेली पवित्र रमजान ईद दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हजारो नागरिक ईदगाहांवर एकत्र येऊन नमाज अदा करतात. मात्र अनेक ठिकाणी ईदगाह परिसरात अस्वच्छता, नादुरुस्त पथदिवे आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे मनपा प्रशासनाने ईदपूर्वीच शहरातील प्रत्येक ईदगाह परिसरात स्वच्छता मोहीम राबवून रंगरंगोटी करावी, तसेच बंद पडलेले किंवा नादुरुस्त असलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच ईदच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक नमाज अदा करण्यासाठी येत असल्याने पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. नमाज पठणासाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मनपा प्रशासनाने विशेष नियोजन करावे, असेही निवेदनात नमूद आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे