
लातूर, 10 मार्च (हिं.स.)
:अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ आणि १९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक उदगीर नगरीत संपन्न होणार आहे. ८७ वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेल्या या मातृसंस्थेच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले निमंत्रण स्वीकारले असून, मी नक्की येतो असा शब्द त्यांनी दिला आहे. यामुळे या अधिवेशनाचा उत्साह द्विगुणित झाला असून संपूर्ण राज्यातून पत्रकारांचे लक्ष आता उदगीरकडे लागले आहे.
या भव्य सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी मुंबईत या अधिवेशनाची अधिकृत घोषणा केली. उदगीरचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता, त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मान्य केले.
अधिवेशनाची ठळक वैशिष्ट्ये
देशभरातून उपस्थिती: यंदाच्या अधिवेशनासाठी संपूर्ण भारतातून सुमारे ३००० पत्रकार उपस्थित राहण्याचा अंदाज असून त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे.
उदगीरमध्ये तयारीचा वेग: अधिवेशनाच्या नियोजनासाठी उदगीर येथे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच एस.एम.देशमुख यांच्या हस्ते पार पडले.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती: या सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज पत्रकार आणि विचारवंतांना निमंत्रित करण्यात येणार असल्याने यंदाचे अधिवेशन 'हटके' ठरणार आहे.
रोहा, पिंपरी-चिंचवड, शेगाव आणि नांदेड येथील यशस्वी अधिवेशनानंतर आता उदगीरमध्ये होणारा हा सोहळा मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis