हलाखीच्या परिस्थितीच्या उमेदवाराची नगरसेवक म्हणून निवड
अकोला, 21 जानेवारी (हिं.स.)। निवडणूक म्हटली की पैश्याचा विषय येतोच, हे सर्वश्रुत आहे. मात्र अकोल्यातील जया गेडाम ह्या नवनिर्वाचित नागरसेविकेचा हलाखीची परिस्थिती असताना पक्षाची उमेदवारी मिळाली आणि मतदारांनीही त्यांना पसंती देत थेट निवडूनही आणले.
Photo


अकोला, 21 जानेवारी (हिं.स.)।

निवडणूक म्हटली की पैश्याचा विषय येतोच, हे सर्वश्रुत आहे. मात्र अकोल्यातील जया गेडाम ह्या नवनिर्वाचित नागरसेविकेचा हलाखीची परिस्थिती असताना पक्षाची उमेदवारी मिळाली आणि मतदारांनीही त्यांना पसंती देत थेट निवडूनही आणले.

अकोला महापालिकेच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका जया गेडाम यांची अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थिती जीवनाशी संघर्ष करत कसाबसा घरचा गाडा हकताना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. आणि अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून त्यांनी नगरसेवक म्हणून दणदणीत विजयही मिळवला आहे. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक अडथळ्यांचा सामना करत त्यांनी केलेला हा विजय नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सामान्य कुटुंबातील जया गेडाम याआधी 2012 मध्ये नगरसेविका राहिल्या, मात्र अवघ्या 15 वर्षांच्या वयात मुलाचं निधन आणि पतीला हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करावी लागली. पण 13 वर्षानंतर पुन्हा त्यांना काँग्रेसने संधी दिली व मतदारांनी पसंती देत त्यांना पुन्हा निवडून आणलं. निवडणूक काळात अनेक अडचणी आल्या. प्रचारासाठी पुरेसा निधी नसणे, प्रतिस्पर्ध्यांकडून मोठ्या प्रमाणावर होणारा प्रचार आणि काही ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागले. मात्र, या सर्वांवर मात करत जया गेडाम यांनी संयम, प्रामाणिकपणा आणि लोकसहभागाच्या बळावर यश मिळवले.

घरचा गाडा हाकण्यासाठी जया गेडाम यांचे पती विनोद गेडाम खालावलेल्या तब्यतीतही कापडाच्या दुकानात अवघ्या 10 हजार रुपये महिन्यावर काम करतात, मुलगा वारल्यापासून दोघेही पती पत्नीच राहतात, विशेष म्हणजे या नगरसेविकेजवळ स्वतःच घरही नाही, आणि घर बांधायला अकोला शहरात जागाही नाही.

हलाखीची परितिथी आणि निवडणूक रिंगणात दिग्गज प्रतिस्पर्धी अश्या परिस्तिथीत प्रचाराला पैसा कुठून आणायचा ह्या विवंचनेत असताना पक्षाने आणि पॅनल मधल्या इतर उमेदवारांनी जया गेडाम यांना मदत केली, आणि त्यांनी विजय मिळवत सर्वांच्या मेहनतीची परतफेड केली.

हलाखीची परिस्तिथी असलेल्या जया गेडाम यांना विजय मिळाल्याने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. एकीकडे मोठ्या पक्षांकडून कोट्यावधी रुपये खर्च होत असताना, मागासलेल्या भागातून रुपयाही खर्च न करता एका गरीब कुटुंबातील महिला निवडून येन हे लोकशाहीचे मूल्य जिवंत असल्याचं प्रतीक असल्याचं मत राजकीय विश्लेषकांच आहे.

निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष साजरा केला. मात्र स्वतःच बेघर असलेल्या नगरसेविकेला आता इतरांच्या घरकुलासाठी सभागृहात भांडावे लागेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande