लातूर जिल्हा परिषदेवर भाजपाचाच झेंडा फडकणार - बसवराज पाटील
लातूर, 21 जानेवारी (हिं.स.)। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्ह्यातील
भाजप जिल्हा परिषद


लातूर, 21 जानेवारी (हिं.स.)।

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्ह्यातील जागावाटपाचे सूत्र स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या एकूण ५९ जागांपैकी ५० जागांवर भाजपा निवडणूक लढवणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ८ जागांवर आणि शिवसेना (शिंदे गट) औसा येथील १ जागेवर निवडणूक लढवेल. तसेच पंचायत समितीच्या ११८ जागांपैकी १०१ जागांवर भाजपा आणि उर्वरित जागांवर मित्रपक्ष निवडणूक लढवणार असून, अर्ज माघारीनंतर काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार रणनीती ठरवली जाईल.

उमेदवारी निश्चित करताना उमेदवाराचा निवड प्रक्रिया, जनसेवेची आवड, सामाजिक - राजकीय पार्श्वभूमी, आणि आरक्षण या निकषांचा काटेकोर विचार करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विकासकामांचा अजेंडा आणि ध्येयधोरणे घेऊन भाजपा या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. विशेषतः उदगीर आणि अहमदपूर या भागात राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपची युती झालेली असून, यामुळे महायुतीचे पारडे जड झाले आहे. या पत्रकार परिषदेस माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी सभापती नीलकंठ मिरकले, जिल्हा सचिव सौ. मनिषा नवणे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

औशात शिवसेनेला भगदाड; माजी आमदार दिनकर माने यांचा भाजपमध्ये 'भव्य' प्रवेश निश्चित!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच लातूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकर माने हे लवकरच आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली.

दिनकर माने यांच्या रूपाने औसा परिसरात मोठी ताकद असलेला आणि जनसंपर्क असलेला नेता भाजपला मिळाल्याने, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे पारडे जड झाले आहे. माने यांच्या भाजप प्रवेशामुळे औसा मतदारसंघात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असून, या 'भव्य-दिव्य' प्रवेश सोहळ्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील हा सर्वात मोठा 'मास्टरस्ट्रोक' मानला जात असून, यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

मैत्रीचा फॉर्म्युला : उदगीर आणि अहमदपूर

उदगीर आणि अहमदपूर या दोन महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षांची ताकद एकवटल्यामुळे महायुतीचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून, विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मात्र परिस्थितीनुसार निर्णय घेतले जाणार आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक समीकरणे आणि कार्यकर्त्यांचा कल पाहून 'दोस्ती' ऐवजी एकमेकांविरुद्ध लढत होण्याची शक्यताही पाटील यांनी वर्तवली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच नेमकी कोणत्या गटात कोणाशी लढत होईल, याचे चित्र स्पष्ट होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande