
लातूर, 21 जानेवारी, (हिं.स.)। ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागामार्फत ‘हिंद दी चादर’ पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून श्री गुरु तेग बहादूरजी यांची जीवनगाथा उभी केली. हा उपक्रम श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या अमर बलिदानाची आठवण करून देणारा आणि धार्मिक सहिष्णुता, मानवतावाद व धैर्याचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा ठरला.
या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील ३४ विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. यामध्ये अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय, औसा तालुक्यातील सेलू येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, भादा येथील जिल्हा परिषद प्रशाला, लामजना येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा यासह इतर शाळातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप नागरगोजे, स्पर्धेचे समन्वयक सतीश भापकर, परीक्षक विजय म्हस्के व हरी कुंभार यावेळी उपस्थित होते.
श्री गुरु तेग बहादूरजींना हिंद दी चादर अर्थात भारताची ढाल म्हणून ओळखले जाते, त्यांनी सहिष्णुता, मानवतावादासाठी आपले बलिदान दिले. त्यांच्या शहीदीला ३५० वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जनजागृतीसाठी लातूर शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis