श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त लातुरात कार्यक्रम
लातूर, 21 जानेवारी, (हिं.स.)। ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने
हिंद दी चादर


लातूर, 21 जानेवारी, (हिं.स.)। ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने जाणार असून या अनुषंगाने जिल्ह्यात होत असलेल्या जनजागृती उपक्रमांचा व पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज आढावा घेतला. तसेच पुढील दोन दिवस जिल्ह्यात व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रभात फेरीचे आयोजन करून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा इतिहास आणि नांदेड येथे आयोजित कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी. तसेच परिपाठाच्यावेळी सतिंदर सरताज यांचे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित गीत दाखविण्यात यावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. या कार्यक्रमात शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर होणाऱ्या या विशेष कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातूनही नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिक्षण विभागामार्फत विविध स्पर्धा, प्रभात फेरीद्वारे जनजागृती

राज्य समन्वयक समितीने शिफारस केलेले श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावरील गीत लातूर जिल्ह्यातील २ हजार ६६६ शाळा व महाविद्यालयांमध्ये दररोजच्या परिपाठात दाखविले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला आहे. यासोबतच १ हजार २९५ शाळांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या इतिहासावर आधारित स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर निबंध स्पर्धा, पथनाट्य, गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्या विद्यार्थ्यांची नावे विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर पाठविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ४ सिनेमागृहात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित गीत दाखविले जात आहे. तसेच नांदेड येथील कार्यक्रमाचे माहिती देणारे फलक जिल्ह्यात लावण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande