
काठमांडू, 21 जानेवारी (हिं.स.)।नेपाळमध्ये गेल्या वर्षी जनरेशन Z च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांनंतर आता मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. सत्तास्थापन करण्याच्या या शर्यतीत आतापर्यंत चार माजी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतून आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे 2026 मधील नेपाळची निवडणूक अत्यंत मनोरंजक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणूक येत्या 5 मार्च रोजी होणार आहे.
यावेळी नेपाळचे चार माजी पंतप्रधान पुन्हा एकदा सत्तेसाठी मैदानात उतरले आहेत. यामध्ये नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) चे अध्यक्ष आणि अपदस्थ पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे प्रमुख आहेत. ते झापा–5 मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (माओवादी सेंटर) चे माजी पंतप्रधान पुष्पकमल दाहाल ‘प्रचंड’ यांनी रुकुम पूर्व मतदारसंघातून नामांकन दाखल केले आहे.
याशिवाय, नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाळ यांनी रौतहट–1 मतदारसंघातून, तर प्रगतिशील लोकशाही पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान बाबुराम भट्टराई यांनी गोरखा–2 मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नेपाळच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत चार माजी पंतप्रधान निवडणूक रिंगणात असले, तरी दोन अन्य माजी पंतप्रधान—नेपाळी काँग्रेसचे नेते शेर बहादुर देउबा आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते झाला नाथ खनाल—या शर्यतीतून बाहेर आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, 9 सप्टेंबर रोजी युवा नेतृत्वाखालील जनरेशन Z च्या हिंसक आंदोलनांनंतर के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळेच नेपाळमध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणूक घेणे अपरिहार्य झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode