
वॉशिंग्टन, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेतील मिसिसिपी किनारपट्टीजवळील हॉर्न आयलंड परिसरात सेसना विमान कोसळले. या विमानात दोन मुलांसह एकूण सहा जण प्रवास करत होते.अपघातानंतर बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेच्या तटरक्षक दलाने बचाव पथके तैनात केली आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही प्रवाशाचा शोध लागलेला नाही.
तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) कडून त्यांना या अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर बचाव पथकांनी हॉर्न आयलंडच्या ईशान्येकडील समुद्रात शोधमोहीम सुरू केली.अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या हार्टलँड विभागाने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, मंगळवारी मोबाइल येथील तटरक्षक दलाला एफएएकडून विमान अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर बचाव पथकांनी मिसिसिपीतील हॉर्न आयलंडपासून दोन मैल ईशान्येला कोसळलेल्या सेसना सेंच्युरियन २१० विमानाचा शोध सुरू केला. या विमानात सहा जण प्रवास करत होते.
एफएएच्या प्रवक्त्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे ३.३० वाजता पास्कागौला शहराच्या नैऋत्येला हे विमान कोसळले. मात्र, विमानात नेमके किती प्रवासी होते, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही. विमानातील प्रवाशांची संख्या अद्याप निश्चित झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. या अपघाताची चौकशी एफएए आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) करणार आहेत.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, विमानात चार प्रौढ आणि आठ ते १२ वर्षे वयोगटातील दोन मुले होती. अपघात होण्यापूर्वी हे विमान दर मिनिटाला सुमारे १० हजार फूट वेगाने खाली येत होते, अशी माहिती समोर आली आहे.हे सेसना सेंच्युरियन २१० विमान न्यू ऑर्लिन्स लेकफ्रंट विमानतळावरून फ्लोरिडातील फोर्ट मायर्स येथील पेज फील्डकडे जात होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे ३.४५ वाजता हे विमान एफएएच्या रडारवरून गायब झाले.समुद्रात सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना विमानाचे काही अवशेष, एक लाइफ राफ्ट आणि तीन लाइफ जॅकेट सापडले आहेत. एका वृत्तानुसार, संध्याकाळी ५.४० वाजेपर्यंत विमानातील एकाही प्रवाशाचा शोध लागला नव्हता.
बचाव पथके हॉर्न आयलंडच्या ईशान्येला सुमारे दोन नॉटिकल मैल अंतरावरील समुद्रात शोधमोहीम राबवत आहेत. विशेष म्हणजे, गल्फ कोस्ट परिसरात असलेले हॉर्न आयलंड हे संरक्षित नैसर्गिक क्षेत्र आहे. या भागात केवळ खासगी बोटींच्या माध्यमातूनच पोहोचता येते. त्यामुळे बचावकार्य अत्यंत सावधगिरीने केले जात आहे.
नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने या अपघाताची माहिती मिळाल्याचे स्पष्ट केले असून, या प्रकरणाशी संबंधित तथ्ये गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. विमान नेमक्या कोणत्या परिस्थितीत कोसळले, याचा शोध घेण्यासाठी एनटीएसबी आणि एफएए संयुक्तपणे तपास करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode