
जेरुसलेम , 25 नोव्हेंबर (हिं.स.)।इस्रायलचे कार्यवाहक संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणबाबत मोठा दावा केला आहे. इराण रासायनिक शस्त्रांची निर्मिती करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इस्रायली प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त दिले आहे. पत्रकारांशी बोलताना काट्झ यांनी इराण रासायनिक शस्त्रे विकसित करण्याच्या प्रक्रियेत असल्याचा दावा केला. मात्र, हा कार्यक्रम नेमका किती पुढे गेला आहे, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. तसेच ही शस्त्रे नेमकी कुठे तयार केली जात आहेत, हेही त्यांनी स्पष्ट केले नाही.
काट्झ म्हणाले की, जून २०२५ मध्ये इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले होते. त्यानंतर इराणने आपला अणुकार्यक्रम पुन्हा सुरू केलेला नाही. मात्र, तो पुन्हा सुरू करण्यासाठी इराण प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळत आहेत.काट्झ यांनी पुढे म्हटले, “इराणचा इस्रायलवर हल्ला करण्याचा हेतू असल्याची माहिती आम्हाला मिळाली, तर संभाव्य धोका टाळण्यासाठी इस्रायली सैन्याला आधीच हल्ला करण्याचे आदेश आम्ही देऊ शकत नाही का? इराणने आधी आमच्यावर हल्ला केला, तर ते आमचे अपयश ठरेल.”
इस्रायलच्या सरकारी प्रसारकनेही यासंदर्भात एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलने अमेरिका आणि आखाती देशांसोबत गुप्तचर माहिती सामायिक केली होती. इराण या देशांविरोधात रासायनिक शस्त्रांचा वापर करण्याचा विचार करत असल्याचे या माहितीमध्ये नमूद करण्यात आले होते. इराण रासायनिक शस्त्रे विकसित करत असल्याची माहिती इस्रायलकडे दशकाहून अधिक काळापासून असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.
इस्रायली अधिकाऱ्यांच्या या दाव्यांदरम्यान इराणनेही अमेरिकेला इशारा दिला आहे. इराणच्या सशस्त्र दलांचे प्रमुख मेजर जनरल अली अब्दोल्लाही यांनी मंगळवारी हा इशारा दिला. अमेरिका आपल्या लष्करी तळांचे ठिकाण बदलून ते या प्रदेशात कुठेही हलवू शकते; मात्र, ते इराणच्या सशस्त्र दलांच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यातच असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी ‘बसीज सप्ताहा’निमित्त आयोजित बैठकीत जनरल अब्दोल्लाही यांनी बसीज संघटनेच्या प्रमुखांशी संवाद साधला. अलीकडील युद्धात अमेरिकेच्या लष्करी तळांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. यापैकी अनेक तळ वापरण्यायोग्य राहिले नसल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले, “यापैकी काही लष्करी तळ अद्याप पूर्वीप्रमाणे कार्यान्वित होऊ शकलेले नाहीत. अमेरिकेकडून आपल्या सैनिकांच्या तैनातीची ठिकाणे बदलण्याचे आणि त्यांना अधिक दूरच्या भागांत हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठा दावा केला. या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांच्या प्रशासनाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले. युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत आता या मार्गावरून अधिक प्रमाणात तेलाची वाहतूक होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode