
* केरळच्या काझिया लिझ मेजोने केले भारताचे प्रतिनिधित्व
सॅन जुआन, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : यंदाच्या 75व्या 'मिस युनिव्हर्स' सौंदर्यस्पर्धेचे विजेतेपद प्यूर्टो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने पटकावले. 24 नोव्हेंबर रोजी सॅन जुआन येथील कोलिसेओ दे प्यूर्टो रिको होजे मिगुएल अॅग्रेलोट स्टेडियममध्ये झालेल्या नेत्रदीपक सोहळ्यात तिने हा किताब जिंकला. जगभरातील 115 स्पर्धकांना मागे सोडत तिने तिने किताबावर आपले नाव कोरले.
विजेतेपदासाठी ३,१५० हिरे जडवलेला एक विशेष हिऱ्यांचा मुकुट तयार करण्यात आला होता. या सौंदर्य स्पर्धेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त बनवलेला हा मुकुट १८ कॅरेट पांढऱ्या सोन्यापासून (व्हाइट गोल्ड) तयार केला गेला आहे.
आपल्या मायदेशातील प्रेक्षकांसमोर मिळालेल्या या विजयामुळे प्यूर्टो रिकोने सहाव्यांदा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकत इतिहास रचला. याआधी 1970 मध्ये मारिसोल मालारेट, 1985 मध्ये डेबोरा कार्थी-ड्यू, 1993 मध्ये दयानारा टोरेस, 2001 मध्ये डेनिस क्विनोनेस आणि 2006 मध्ये झुलेयका रिवेरा यांनी प्यूर्टो रिकोला हा सन्मान मिळवून दिला.
सॅन सेबॅस्टियनचे प्रतिनिधित्व करणारी 27 वर्षीय जेनिफर हिचा प्रवास सर्वांसाठी खास ठरला. तिने फेब्रुवारी 2026 मध्येच रॅम्पवर पहिले पाऊल ठेवले आणि जूनमध्ये ती 'मिस युनिव्हर्स प्यूर्टो रिको 2026' ठरली. सौंदर्यस्पर्धांचा फारसा अनुभव नसतानाही तिने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवून बाजी मारली. विशेष म्हणजे ती विवाहित असून तिला पेनेलोप नावाची सात वर्षांची मुलगी आहे.
जेनिफरने मानसशास्त्र आणि समाजकार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 2021 पासून तिने टेक्सासमधील फोर्ट कावाझोस येथे अमेरिकन लष्कराच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमात काम करत घरगुती हिंसाचार आणि बाल अत्याचार पीडितांना मोठा आधार दिला. तसेच, तिने कार्ल आर डार्नल आर्मी मेडिकल सेंटरमध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम केले. या जागतिक मंचाचा वापर समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोककल्याणाचे काम पुढे नेण्यासाठी करणार असल्याचे तिने सांगितले. स्पर्धेच्या अमृतमहोत्सवी वर्षी मिळालेल्या या विजयामुळे प्यूर्टो रिकोचा तब्बल वीस वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपला.
डोमिनिकन रिपब्लिकची मेलिसा नुनेझ ही पहिली उपविजेती (फर्स्ट रनर-अप) ठरली. व्हेनेझुएलाची क्लारा वेगास गोएट्झ दुसरी उपविजेती (सेकंड रनर-अप) ठरली, तर फिलीपिन्सची बी मिलान-विंडोर्स्की तिसरी उपविजेती (थर्ड रनर-अप) ठरली. यावर्षी केरळची १९ वर्षीय काझिया लिझ मेजो हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. जगभरातील ११६ देश आणि प्रदेशांतील स्पर्धकांमध्ये या किताबासाठी स्पर्धा झाली. काझियाने पहिल्या ३० स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. पण तिला पहिल्या १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवता आले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी