देवळाली : युद्ध प्रात्यक्षिकांनी आसमंत निनादला
The-sky
देवळाली : युद्ध प्रात्यक्षिकांनी आसमंत निनादला


नाशिक, 21 जानेवारी (हिं.स.)।

स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वतीने बुधवारी (दि. २१) देवळाली गोळीबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ‘तोपची’ वार्षिक युद्धसराव प्रात्यक्षिकांनी

देवळाली फायरिंग रेंज अक्षरशः हादरून गेली. अवघ्या काही सेकंदांतच आर्टिलरीच्या प्रशिक्षित गनरच्या चमूने डोंगररांगांवरील निश्चित लक्ष्य अचूक भेदले.

भव्य सोहळ्याला तामिळनाडूतील वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचे कमांडंट लेफ्टनंट जनरल मनीष एरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्कूल ऑफ आर्टिलरीचे कर्नल कमांडंट, अतिविशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल व विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सरना यांनी त्यांचे स्वागत केले.

या वेळी ‘कॅट्स’चे कमांडंट मेजर जनरल अभिनय राय यांच्यासह नेपाळ आर्मी कमांड अँड स्टाफ कॉलेजचे वरिष्ठ सैनिकी अधिकारी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. सालाबादप्रमाणे यंदाही सकाळी दहा वाजता देवळाली फायरिंग रेंज परिसरात या युद्धसराव प्रात्यक्षिकांचा थरार अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळाली. गनरच्या चमूकडून एकूण आठ तोफा आणि दोन रॉकेट लाँचरच्या साहाय्याने आधुनिक व अनोख्या युद्धशैलीचे शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तोफांच्या भीषण आवाजाने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले, तर बॉम्बगोळ्यांच्या स्फोटांनी कानठळ्या बसल्या.

चौकट

‘ड्रोन’ ने वेधले लक्ष

बदलत्या युद्धतंत्रज्ञानानुसार आधुनिक युद्धप्रणालीचा भाग असलेल्या ‘ड्रोन अटॅक’चे प्रशिक्षणही यावेळी सादर करण्यात आले. . ड्रोनद्वारे शत्रूच्या तळावर रेकी करणे असो वा अचूक हल्ला चढवणे, यासाठी भारतीय सैन्यदल पूर्णपणे सज्ज असल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी संपूर्ण जगाने पाहिले आहे. या प्रात्यक्षिकांमध्ये बेसिक ते ॲडव्हान्स्ड अशा दहा ते बारा विविध प्रकारच्या ड्रोनची झलक पाहायला मिळाली, त्याला उपस्थितां ची पसंती मिळाली

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande